नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. व्याकरणिक विशेष : {चालू भूतकाळ}
क्रियाव्याप्तीद्वारे क्रियेची पूर्णता, अपूर्णता, प्रगती किंवा पुनरावृत्ती दर्शविली जाते. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रियापदाने दर्शविलेली क्रिया भूतकाळात काही काळासाठी घडत होती / सुरू होती असा बोध होत असेल तर ते वाक्य ‘चालू भूतकाळा’त आहे असे म्हणतात. येथे ‘चालू’ ही संज्ञा क्रिया अपूर्ण असल्याचा निर्देश करते. उदाहरणार्थ, प्रमाण मराठीतील ‘रोहन आंबा खात होता’ या वाक्यातील ‘खात होता’ या क्रियापदबंध संरचनेवरून खाण्याची क्रिया ही भूतकाळात घडत होती / सुरू होती असा बोध होतो. बऱ्याचदा दुसऱ्या एका घटनेचा संदर्भ पुरविण्याचे कार्य ‘चालू भूतकाळा’तील वाक्य करते. उदा. ‘राधा घरात आली तेव्हा रोहन आंबा खात होता’.
१.0 व्याकरणिक विशेषाची नोंदमराठीच्या बोलींमध्ये चालू भूतकाळ दर्शवण्यासाठी तीन प्रकारच्या संरचना आढळल्या आहेत :
(१) [क्रियापद-त+होत-सुसंवाद]; (२) [क्रियापद-पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय+राह क्रियापद(-सुसंवाद)+ सहाय्यक क्रियापद-सुसंवाद]; (३) [क्रियापद-(आख्यातेतर रूप)+लाग क्रियापद+सहाय्यक क्रियापद-सुसंवाद)]. सापडलेल्या तिन्ही प्रकारच्या संरचनांचा भौगोलिक प्रसार व उदाहरणे पुढे दिली आहेत. १.१ पर्यायी रचना १ : [क्रियापद-त+होत-सुसंवाद]चालू भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-त+होत-सुसंवाद] ही रचना राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आढळली.
१.१.१ उदाहरण (जि. गडचिरोली, ता. कोरची, गाव मोहगांव, पु३९, एस.सी, १२वी) तो समोरवाला वेक्ती खाली बाल उच़लत होता to samorwala wekti kʰali bal uclət hota to samor-wala wekti kʰali bal uclə-t hot-a DEM.DIST.3SGM front-NMNLZR.3SGM person down ball pick-IPFV be.PST-3SGM The person in the front was picking up the ball. १.२ पर्यायी रचना २ : [क्रियापद-पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय+राह क्रियापद (-सुसंवाद)+सहाय्यक क्रियापद-सुसंवाद]चालू भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय+राह क्रियापद (-सुसंवाद)+सहाय्यक क्रियापद-सुसंवाद] ही रचना राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये आढळली. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत सदर रचनेची वारंवारिता जास्त प्रमाणात आढळली असून बुलढाणा, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत वारंवारिता कमी आढळली. या रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरणे पुढे दिली आहेत :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
नंदुरबार | नंदुरबार - धानोरा, नवापूर - खांडबारा व चिंचपाडा, शहादा - प्रकाशा |
धुळे | धुळे - लळिंग, सोनगीर, खेडे व खोरदड, शिरपूर - आंबे, शिंगावे व बोराडी, साक्री - धाडणे |
नाशिक | मालेगाव - कळवाडी व कौळाणे (गा.), सटाणा - दरेगाव व मुल्हेर |
जळगाव | जळगाव - वडली, चाळीसगाव - दहिवद |
बुलढाणा | शेगाव - पाडसूळ |
अमरावती | दर्यापूर - भांबोरा, वरूड - गाडेगाव |
नागपूर | नागपूर - सोनेगाव लोधी |
चंद्रपूर | राजुरा - कढोली (बुद्रुक) |
चालू भूतकाळ दर्शवण्यासाठी [क्रियापद-(आख्यातेतर रूप)+लाग क्रियापद+सहाय्यक क्रियापद-सुसंवाद)] ही रचना राज्यातील ४ जिल्ह्यांमध्ये आढळली. या रचनेच्या भौगोलिक प्रसाराचा तपशील आणि उदाहरण पुढे दिले आहे :
जिल्हा | तालुका व गाव |
---|---|
सांगली | मिरज - सोनी |
सोलापूर | सोलापूर - डोणगाव, अक्कलकोट - कुरनूर |
लातूर | लातूर - पाखरसांगवी व तांदुळजा, निलंगा - दादगी, उदगीर - मलकापूर |
नांदेड | किनवट - इस्लापूर, मुखेड - हळणी |